कळंब : कळंब तालुक्यातील डिकसळ येथे एका बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून ५० हजार रुपयांची रोकड आणि शेतजमिनीची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी सुजीत भारत बोराडे (वय २७, रा. डिकसळ, ता. कळंब) यांनी २२ जुलै रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२:१५ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. सुजीत बोराडे यांचे कुटुंबीय घरात नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील पेटीत ठेवलेली ५०,००० रुपयांची रोख रक्कम, शेतीच्या खरेदी-विक्री व्यवहाराची मूळ कागदपत्रे आणि दोन साड्या असा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी जेव्हा हा प्रकार लक्षात आला, तेव्हा बोराडे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे. रोख रकमेसोबतच जमिनीची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याने फिर्यादीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.