कळंब – ‘माझ्या घरी फोन करून गाडी फोडल्याची माहिती का दिली?’ या कारणावरून दोघा जणांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाकडी दांडा व दगडाने मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही, तर त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून नुकसानही केले. ही घटना कळंब तालुक्यातील डिकसळ येथील गणेश नगरमध्ये १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी विश्वजीत मधुकर बोराडे (वय ४३ वर्षे, रा. गणेश नगर, डिकसळ, ता. कळंब) यांनी कळंब पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १३ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपी आकाश अंकुश पवार (रा. फरीदनगर, डिकसळ, ता. कळंब) आणि वैभव अनिल गायकवाड (रा. कल्पना नगर, कळंब) हे त्यांच्या घरी आले. ‘तू माझ्या घरी फोन करून गाडी फोडल्याचे का सांगितले?’ असा जाब विचारत आरोपींनी विश्वजीत बोराडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. फिर्यादीच्या घरासमोर लावलेली त्यांची ह्युंदाई आयटेंव्टी (Hyundai i20) चारचाकी गाडीची काच फोडून आरोपींनी अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान केले. तसेच, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली.
विश्वजीत बोराडे यांनी १४ एप्रिल २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश पवार आणि वैभव गायकवाड यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३३३, ३५१(२), ३५२, ११५(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.