कळंब: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील उमेदवारी वाटपाचा गोंधळ काही थांबताना दिसत नाही. पळसप पाठोपाठ आता कळंब तालुक्यातील डिकसळ जिल्हा परिषद गटातही शिंदे गटाने निष्ठावंत शिवसैनिकांना धक्का देत भाजपमधून ‘आयात’ केलेल्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीला शिंदे गटाची उमेदवारी
डिकसळ जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून, महायुतीच्या जागा वाटपात हा गट शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला आला आहे. मात्र, या ठिकाणी शिवसेनेचा मूळ उमेदवार देण्याऐवजी पक्षाने भाजप कार्यकर्ते तुषार शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जागा शिंदे गटाची असताना उमेदवार मात्र भाजपचा, या समीकरणामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची रणनीती काय आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
निष्ठावंत लता रणदिवेंना उमेदवारी नाकारली
या गटातून शिवसेनेच्या (शिंदे गट) निष्ठावंत कार्यकर्त्या आणि स्थानिक रहिवासी लता बोधराज रणदिवे या प्रबळ दावेदार होत्या.
-
त्या अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय असून गावपातळीवर महिलांचे प्रश्न आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचे मोठे योगदान आहे.
-
स्थानिक शिवसैनिक सुमित बोधराज रणदिवे यांच्या त्या मातोश्री आहेत.
-
लता रणदिवे यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ईटकूर गटातून निवडणूक लढवली होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा असतानाही त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अजित पिंगळेंच्या भूमिकेवर संशय: भाजपप्रेम की पक्षप्रेम?
या सर्व घडामोडींमागे मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून लढलेले अजित पिंगळे यांची भूमिका कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. अजित पिंगळे हे मूळचे भाजपमधील राणा पाटील समर्थक. मागील विधानसभेला त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवली, मात्र ठाकरे गटाचे कैलास पाटील यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती.
पक्षाचा पराभव होऊनही अजित पिंगळे यांनी धडा घेतला नसून, ते आजही निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय करत भाजप कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करत असल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. “अजित पिंगळे हे नक्की शिंदे गटात आहेत की अजूनही भाजपचेच काम करत आहेत?” असा संभ्रम आणि संताप सध्या शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.





