कळंब: तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) येथे शेतातून मातीचा टिप्पर नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ६० वर्षीय वृद्धाला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मस्सा (खं) शिवारातील शेत गट क्रमांक ७४९ मध्ये घडली. याप्रकरणी पीडित वृद्धाने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी विठ्ठल दशरथ गालफाडे (वय ६० वर्षे, रा. मस्सा खं. ता. कळंब, ह.मु. डिकसळ ता. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी श्रीरंग मारुती वरपे, विश्वनाथ श्रीरंग वरपे आणि रोहन देशमुख (सर्व रा. मस्सा खं, ता. कळंब) यांनी त्यांच्या शेतातून मातीचा टिप्पर नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला.
आरोपींनी फिर्यादी गालफाडे यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेनंतर विठ्ठल गालफाडे यांनी १६ मे २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
गालफाडे यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) (कलह/मारामारी), ११५(२) (गंभीर दुखापत करणे), ३५२ (हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग), ३५१(२) (नमूद कलम), ३(५) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(आर), ३(१)(एस), आणि ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.