कळंब – तालुक्यातील खोंदला गावाजवळ मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेले शेतकरी सुबराव शंकर लांडगे (वय ६५) यांचा अद्याप शोध लागलेला नाही. घटना घडून बारा तासांहून अधिक काळ लोटला असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून शोधकार्य अविरत सुरू आहे.
आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खोंदला गावाजवळील पुलावरून जात असताना पाय घसरल्याने सुबराव लांडगे यांचा तोल गेला आणि ते मांजरा नदीच्या वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात पडले. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास (NDRF) चे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पथकाने नदी पात्रात शोधकार्य सुरू केले, मात्र पाण्याचा प्रचंड वेग आणि गढूळ पाण्यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत आहेत. सायंकाळपर्यंत शोध घेऊनही सुबराव लांडगे यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळीच तळ ठोकला आहे. ते बचावकार्यावर स्वतः लक्ष ठेवून असून, प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. त्यांनी लांडगे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
रात्रीच्या वेळी शोधकार्यात अडथळे येत असले तरी, प्रशासनाने शक्य त्या सर्व उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत. मांजरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुबराव लांडगे यांच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे खोंदला गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.