कळंब : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सख्ख्या भावालाच शिवीगाळ करून काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील उपळाई येथे घडली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या भावाच्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात दोन भावांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अनिल जामवंत ओव्हाळ (वय ३४, रा. उपळाई, ता. कळंब, ह. मु. नांदेड फाटा, पुणे) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २८ जून २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी उपळाई येथे घडली.
फिर्यादी अनिल ओव्हाळ आणि त्यांचे भाऊ संतोष जामवंत ओव्हाळ व नितीन जामवंत ओव्हाळ (दोघे रा. उपळाई) यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद झाला. याच वादातून संतोष आणि नितीन यांनी अनिल यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले.
या घटनेनंतर सुमारे महिनाभराने, अनिल ओव्हाळ यांनी मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष ओव्हाळ आणि नितीन ओव्हाळ यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या मारहाणीच्या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.