कळंब – येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट नकाशा आणि खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी खुद्द सह दुय्यम निबंधक ईश्वर नरसाळे यांनीच फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब ज्ञानोबा पांचाळ (रा. कसबा गल्ली), सत्यवान बापुराव सौलाखे (रा. कळंब), असदखा अमिरख पिंजारी (रा. भोईगल्ली), जमील महमद काशीम कुरेशी (रा. खाटीक गल्ली) आणि अनिसोद्दीन खमरोद्दीन काझी (रा. भाजी मंडई, सर्व रा. कळंब) यांनी संगनमत केले. त्यांनी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दस्त क्रमांक ३५७८/२०२४ साठी एक बनावट नकाशा व खोटे रेखांकन तयार करून ते दस्त नोंदणीसाठी सादर केले आणि त्याद्वारे शासनाची फसवणूक केली.
हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर सह दुय्यम निबंधक ईश्वर भारत नरसाळे (वय २६, रा. शिवाजीनगर, कळंब) यांनी ३ सप्टेंबर २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेची विविध कलमे ३१८(४), ३३८, ३४०(२), ३३६(३), ३४१(१), ३(५) आणि नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.