कळंब – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी कळंब शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. शिवसेना नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत काढलेल्या या रॅलीने कळंब शहरातील राजकीय वातावरण अधिक तापवले.
भव्य रॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह
रॅलीला कळंब शहरातील प्रमुख मार्गांवरून नेण्यात आले. ढोल-ताशांच्या , हलगीच्या गजरात, भगवे झेंडे फडकवत आणि जयघोष करत शिवसैनिकांनी शहरात ताकद दाखवली. या प्रचारफेरीने शिंदे गटाची संघटनात्मक ताकद आणि उमेदवार अजित पिंगळे यांच्यावरील विश्वास अधोरेखित केला.
रॅलीनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना खा. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, ते आता फक्त टीका करण्यात गुंतले आहेत. खऱ्या शिवसैनिकांना डावलून त्यांनी शिवसेनेला वैयक्तिक स्वार्थासाठी वापरले.
श्रीकांत शिंदे यांनी धाराशिवमधील उमेदवारीसंदर्भात बोलताना असेही नमूद केले की, आम्ही धाराशिवसाठी निष्ठावान शिवसैनिक आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच खऱ्या शिवसैनिकांना डावलून निवडणुका स्वार्थी हितसंबंधासाठी लढवल्या.
उमेदवार अजित पिंगळे यांना पाठिंबा
श्रीकांत शिंदे यांनी अजित पिंगळे यांचे कौतुक करताना सांगितले की, “पिंगळे हे पक्षाशी निष्ठावान असून त्यांनी नेहमीच जनतेसाठी काम केले आहे. त्यांच्यासारख्या उमेदवारांना पाठिंबा देणे ही शिवसैनिकांची जबाबदारी आहे.” त्यांनी उपस्थितांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
रॅलीमुळे राजकीय वातावरण तापले
या रॅलीनंतर कळंब शहरातील राजकीय समीकरणे अधिकच चर्चेत आली आहेत. शिंदे गटाच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद आणि खा. श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य यामुळे प्रतिस्पर्धी गटांकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रचारसभेने शिंदे गटाने आपली ताकद दाखवत आगामी निवडणुकीतील विजयासाठी जोमाने तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले.