कळंब : शहरातील मुंडे गल्ली येथील एका किराणा दुकानाच्या छताचे पत्रे कापून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि किराणा मालासह एकूण ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धाडसी चोरी सोमवारी (दि. २६) रात्री ते मंगळवारी (दि. २७) सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय सुरेशआप्पा लोखंडे (वय ४२ वर्षे, रा. मुंडे गल्ली, कळंब) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांचे कळंब शहरातील मुंडे गल्लीत ‘वैभवलक्ष्मी’ नावाचे किराणा दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे दत्तात्रय लोखंडे हे २६ मे रोजी रात्री ९ वाजता आपले दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २७ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाच्या छताचे पत्रे कापलेले दिसले.
आत जाऊन पाहिले असता, दुकानातील काही रोख रक्कम आणि किराणा सामान असा एकूण ५१ हजार ८३० रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी छताचे पत्रे कापून दुकानात प्रवेश करत ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच दत्तात्रय लोखंडे यांनी तात्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कळंब पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.