कळंब – कळंब नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चुरशीने आणि मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. कळंबकरांनी लोकशाहीच्या उत्सवात भरघोस सहभाग नोंदवत तब्बल ७२.६९ टक्के मतदान केले आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या, आणि अंतिम आकडेवारीनुसार शहरातील १५,२३४ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदानाची ठळक आकडेवारी:
या निवडणुकीत एकूण २०,९५८ मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी १५,२३४ जणांनी मतदान केले. विशेष म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
-
एकूण मतदान: १५,२३४ (७२.६९%)
-
पुरुष मतदान: ८,००३
-
महिला मतदान: ७,२३१
‘या’ प्रभागात झाले सर्वाधिक मतदान!
शहरातील काही प्रभागांमध्ये मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. वॉर्ड क्रमांक ३ आणि ८ मध्ये ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.
-
सर्वाधिक मतदान: वॉर्ड ३ मधील सावित्रीबाई फुले शाळेतील केंद्रावर (बूथ ३) सर्वाधिक ८१.२७ टक्के मतदान झाले.
-
वॉर्ड ८: जिल्हा परिषद मुलांची प्रशाला (बूथ २) येथे ८१.१३ टक्के मतदान झाले.
-
वॉर्ड १: जिल्हा परिषद कन्या प्रशाला (बूथ १) येथे ८१.०७ टक्के मतदानाची नोंद झाली.
दुसरीकडे, वॉर्ड २ (बूथ २) आणि वॉर्ड ७ (बूथ १) मध्ये मतदानाची टक्केवारी अनुक्रमे ६६.३८% आणि ६६.५१% अशी तुलनेने कमी राहिली.
या विक्रमी मतदानामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले असून, हा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाचा गेम करणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. प्रशासनातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत धोकले यांनी ही माहिती जाहीर केली आहे.






