कळंब शहरातील द्वारका नगरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडून खळबळ उडालेल्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या खुनाने घेतलेलं गूढ वळण, संशयास्पद भूतकाळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत होतं.
अपडेट बातमी वाचा – कळंब खून प्रकरणात मोठा खुलासा: अनैतिक संबंधातून खून? दोन्ही आरोपी अटकेत
दोन्ही आरोपी अखेर अटकेत
मृत मनीषा कारभारी बिडवे यांच्या खुनाच्या प्रकरणात रामेश्वर भोसले आणि सय्यद उस्मान गुलाब (दोघेही रा. केज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी काही तासांपूर्वी सय्यद उस्मान गुलाब याला ताब्यात घेतले होते, तर आता रामेश्वर भोसलेलाही अटक करण्यात आली असून दोघेही पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
दमानियांचा संशय कायम
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या हत्येचा संबंध संतोष देशमुख मर्डर प्रकरणाशी असल्याचा दावा केला होता. मृत महिला देशमुख प्रकरणातील साक्षीदार किंवा आरोपी असू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी या दाव्याला सध्या तरी दुजोरा दिलेला नाही. पोस्टमार्टम अहवालानुसार, डोक्यावर मार झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
गूढ व्यक्तिमत्त्व: अनेक नावं, अनेक ओळखी
मृत मनीषा बिडवे हिची ओळखही संशयास्पद राहिली आहे. ती मनीषा आकुसकर, मनीषा बियाणी, मनीषा उपाडे, मनीषा गोंदवले अशा अनेक नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी वावरायची आणि पुरुषांना अडचणीत आणण्याचे प्रकार करत असल्याचा आरोप स्थानिकांमध्ये चर्चेत आहे.
आता आरोपींच्या चौकशीतून खुनामागील नेमकं कारण, बिडवेच्या गूढ भूतकाळाचा उलगडा आणि देशमुख प्रकरणाशी संबंधित कोणतीही साखळी आहे का, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाचा वेग वाढलेला असून, कळंबमधील या थरारक प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.