धाराशिव: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विजय किसन तवले याला कळंब जिल्हा सत्र न्यायालयाने २१ वर्षांची सक्तमजुरी आणि ६ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांचा युक्तिवाद आणि सबळ पुराव्यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी शनिवारी, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
ही घटना २९ जुलै २०२१ रोजी कळंब तालुक्यातील शेलगाव शिवारात घडली होती. पीडित मुलगी शेतातून लिंबाची फांदी आणण्यासाठी गेली असता, ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती सापडली नाही. यानंतर, पीडितेच्या वडिलांनी गावातीलच विजय किसन तवले याने आपल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर आणि एसडीआर काढून तांत्रिक विश्लेषण केले असता, तो पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथे जाऊन आरोपी विजय तवले आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी पीडितेची चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने पीडितेचे आणि तिच्या बहिणीचे फोटो मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ‘जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर हे फोटो सर्वांना दाखवेन,’ अशी भीती घालून त्याने तिला पुणे आणि शिरोली येथे नेले. तिथे त्याने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
पोलिसांनी तपास पूर्ण करून कळंब सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलीची साक्ष सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. तसेच, वैद्यकीय अहवाल आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. अतिरिक्त सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपी विजय किसन तवले याला भारतीय दंड विधान कलम ३६३ (अपहरण), ३७६(३) (अत्याचार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ च्या कलम ३ आणि ४(२) अन्वये २१ वर्षांची सक्तमजुरी आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाला असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.