कळंब – शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात कळंब पोलिसांनी कारवाई केली आहे. सागर कुमार बारटक्के (वय ३६) आणि इलाही चांद तांबोळी (वय ५५, दोघेही रा. मोमीन गल्ली, कळंब) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण १३,६६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते पावणेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरजवळील साई पान स्टॉल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सोनार लाईनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनंत स्टॉल येथे आरोपींनी विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा, राजनिवास पान मसाला, तंबाखू आणि सुगंधी सुपारी यांसारखे पदार्थ जवळ बाळगले होते.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.