कळंब (धाराशिव): कळंब तालुक्यात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील भाटशिरपूरा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. २२) पहाटे घडली. एकाच दिवशी तालुक्यातील दोन गावांमध्ये घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी विष्णु दासु खापे (वय ५०, रा. भाटशिरपूरा, ता. कळंब) यांनी २२ जुलै रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी खोलीची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि ३,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४५,००० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पहाटेच्या वेळी हा प्रकार घडल्याने तो कोणाच्याही लक्षात आला नाही. सकाळी उठल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विष्णु खापे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
या फिर्यादीवरून शिराढोण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.