कळंब : शहरातील कसबा पेठेत असलेल्या एका दुकानाचे मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ६४ हजार २९८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीदास विठ्ठल भाकरे (वय ४०, रा. कसबा पेठ, कळंब) असे फिर्यादी दुकान मालकाचे नाव आहे. त्यांचे कळंब शहरातील अंबिका मॉल शेजारी ‘निखली इंटरप्रायजेस’ नावाचे दुकान आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान झाली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानात असलेले तार कटर मशीन, एक हजार मीटर ॲल्युमिनियम तार, मायक्रोटेक कंपनीचा इन्व्हर्टर, ॲमरॉन कंपनीची बॅटरी, एमआय कंपनीचा एलईडी टीव्ही आणि कॅमेऱ्याचा डीव्हीआर असा एकूण १,६४,२९८ रुपये किमतीचा माल चोरून नेला.
घटनेच्या काही दिवसानंतर, रोहीदास भाकरे यांनी बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कळंब पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.