कळंब : कळंब तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून एक मोटारसायकल आणि एक महागडा मोबाईल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, दिलीप मरीबा गव्हाळे (वय ५९, रा. घोडेगाव, ता. जामखेड, ह.मु. कळंब) यांची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 14 JQ 4641) चोरीला गेली. ६ जून २०२५ रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी खडकी गावाजवळील पुलाजवळ रस्त्याच्या कडेला आपली अंदाजे २०,००० रुपये किमतीची गाडी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी दिलीप गव्हाळे यांनी ८ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना कळंब शहरातील मोहेकर महाविद्यालयाच्या आवारात घडली. धीरज गणेश चटप (वय २१, रा. डाकेफळ, ता. केज) यांचा अंदाजे १०,००० रुपये किमतीचा वनप्लस नॉर्ड सीई ३ लाईट मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरला. ही घटना ६ जून रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. धीरज चटप यांनी ८ जून रोजी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.