कळंब : कळंब-येरमाळा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल आणि रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड फोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, धान्याचे कट्टे, शीतपेये आणि इतर साहित्यासह तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग साहेबराव ताटे (वय ५५, रा. मस्सा खं., ता. कळंब, जि. धाराशिव) यांचे कळंब ते येरमाळा जाणाऱ्या रस्त्यावर ‘मोसमी व श्रीशा हॉटेल’ आणि रसवंती गृह आहे. हे हॉटेल पत्र्याच्या शेडमध्ये चालवले जाते. शुक्रवार (ता. २७) रात्री साडेअकरा ते शनिवार (ता. २८) सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या बंद हॉटेलचे शेड फोडून आत प्रवेश केला.
या अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमधील राजम्याचे १० कट्टे, हरभऱ्याचे १० कट्टे, एक सोनी (Sony) कंपनीचा लॅपटॉप, दूध तापवण्याची दोन पातेली आणि साऊंड बॉक्स चोरला. याशिवाय चोरट्यांनी थम्सअप, स्प्राइट, स्टिंग आणि जिरा सोडा या शीतपेयांच्या बाटल्या, शेवची पाकिटे, तसेच दुकानाची सर्व्हिस केबल व वीज मीटर असा एकूण सुमारे १,००,००० रुपये किमतीचा माल चोरून नेला.
हा चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिक बजरंग ताटे यांनी सोमवारी (ता. ३०) कळंब पोलिस ठाण्यात जाऊन सविस्तर फिर्याद दिली. या प्रथम खबरीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३४(१) आणि ३०५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महामार्गालगत झालेल्या या चोरीमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, कळंब पोलिस या गुन्ह्याचा कसून तपास करत आहेत.



