कळंब – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना कळंब येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश लहु मोहीते (वय २४, रा. इंदिरानगर, कळंब) हे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडजवळ असताना, आरोपी कुलदीप चोंदे (रा. कळंब) याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, पैसे न दिल्याने संतापलेल्या आरोपीने शिवीगाळ करत गणेश मोहीते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी जखमी गणेश मोहीते यांनी ८ मार्च २०२५ रोजी कळंब पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी कुलदीप चोंदे याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, ११५ (२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कळंब पोलिस करत आहेत.
परंडा तालुक्यात तरुणावर हल्ला; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
अंबी – पांढरेवाडी (ता. परंडा) येथे अज्ञात कारणावरून एका तरुणाला लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबी पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब महादेव गिरी (वय ४९, रा. देधोवडी, पोस्ट पाथ्रुड, ता. भूम) यांचा मुलगा माऊली बाबासाहेब गिरी यास ३ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता पांढरेवाडी येथे आरोपी सतीश जगताप (रा. पांढरेवाडी) व त्याच्या अन्य सात साथीदारांनी अज्ञात कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड व काठ्यांनी बेदम मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी बाबासाहेब गिरी यांनी ८ मार्च २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून अंबी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (२), १८९, १९१ (२), १९३ (३), १९० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबी पोलिस करीत आहेत.
शेतीच्या वादातून युवकाला मारहाण; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
बेंबळी – आंबेवाडी (ता. धाराशिव) येथे शेतीच्या वादातून दोघा भावांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले असून, त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम तानाजी गायकवाड (वय २१, रा. आंबेवाडी, ता. जि. धाराशिव) यांच्यावर ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आंबेवाडी शिवारात आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड आणि अक्षय शिवाजी गायकवाड (दोघेही रा. आंबेवाडी) यांनी शेतीच्या वादावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी श्रीराम गायकवाड यांनी ८ मार्च २०२५ रोजी बेंबळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलिस करत आहेत.