परंडा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ‘पार्टीला चल’ असे म्हणत तरुणाला बाहेर नेऊन डोक्यात जड वस्तूने मारून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील कंडारी येथे घडली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी हत्या केल्यानंतर हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोतीराम बब्रुवान जाधव (वय ४०, रा. कंडारी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयताची पत्नी सोनाली मोतीराम जाधव (वय ३५) यांनी आंबी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडारी येथील रहिवासी आरोपी विष्णू कालीदास तिंबोळे (वय २७) आणि योगेश नागेश उर्फ नागनाथ तिंबोळे (वय ३२) यांनी कट रचून हे कृत्य केले. दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास आरोपींनी मोतीराम जाधव यांना पार्टी करण्यासाठी म्हणून दुचाकीवरून सोबत नेले.
कंडारी ते सोनारी जाणाऱ्या रोडवर पप्पू राचखंडे यांच्या घरासमोर आल्यावर, जुन्या भांडणाचे कारण पुढे करून आरोपींनी मोतीराम यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यामध्ये मोतीराम यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी मयताची पत्नी सोनाली जाधव यांना मोतीराम यांचा अपघात झाल्याची खोटी माहिती दिली.
मात्र, अधिक तपासाअंती हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. सोनाली जाधव यांनी १६ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






