धाराशिव/लातूर: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या एका नामांकित निवासी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एचआयव्हीबाधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संस्थेच्या दोन संचालकांसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही मूळची धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने धाडस दाखवून ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संस्थेतील एका व्यक्तीने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, यापूर्वी लातूर शहरातील एका मोठ्या रुग्णालयात पीडित मुलीचा गर्भपात करण्यात आल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.
पीडित मुलीने संस्थेतील तक्रार पेटीत लेखी तक्रार केली असता, संस्थेच्या एका कर्मचाऱ्याने तिच्याशी वाद घालून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक अत्याचार करणारा मुख्य आरोपी, संस्थेचे दोन संचालक आणि तक्रारीवरून वाद घालणारा कर्मचारी यांच्यासह एकूण सहा जणांना आरोपी केले आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना औसा तालुक्याच्या हद्दीत घडल्याने, ढोकी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी औसा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.
पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संस्थेतील आणखी काही मुलींवर अशाच प्रकारे अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.