परंडा: दोन महिन्यांपूर्वी कपिलापुरी येथून बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलेल्या परंडा तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचे आगमन झाले आहे. तालुक्यातील ब्रम्हगाव शिवारात एका रेड्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ब्रम्हगाव येथील शेतकरी महादेव हिंगणकर यांच्या वस्तीवर शनिवारी (दि. १९) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या रेड्यावर हल्ला करून त्याला तब्बल १५० फूट ओढत नेले आणि त्याचा फडशा पाडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हगावचे सरपंच रुपेश काळे यांनी तात्काळ वनविभागाला याची कल्पना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे, त्या परिसरात कॅमेरे लावणार असल्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला दोन महिन्यांपूर्वीच कपिलापुरी शिवारात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. या बिबट्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा ब्रम्हगाव शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात बिबट्याने परंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये २० ते २५ पाळीव जनावरांवर हल्ले केल्याची नोंद आहे. या ताज्या घटनेमुळे बिबट्याचा पुन्हा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.