तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे आज, सोमवार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एका युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल बाबुराव गायकवाड (वय २७ वर्षे) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल गायकवाड हा मसला खुर्द येथील रहिवासी असून, दुपारी गावाच्या परिसरात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप मारली. या हल्ल्यात निखिलच्या डाव्या बाजूच्या दंडाला मोठी जखम झाली आहे. तसेच, बिबट्याने त्याच्या अंगावर नखांनी वार केले आहेत.
घटनेनंतर तात्काळ निखिलला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. निखिल शरीराने जाडजूड असल्यामुळे तो या हल्ल्यातून बचावला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे मसला खुर्द आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.