लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयत राहुल विजय शर्मा (वय २३ वर्षे) यांने २४ एप्रिल २०२४ रोजी काटे चिंचोली गावातील माकणी धरणाच्या फिल्टर टाकीजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शर्मा ( रा. हिरापुर ता. घोरा डोंगरी जि.बैतुल, मध्यप्रदेश ) यास आरोपी गौतम संतोष हलदार, प्रल्हाद हलदार, उत्तम संतोष हलदार आणि जिवन मंडल यांनी पाण्याच्या टाकीच्या कामासाठी ॲडव्हान्स रक्कम देऊन कामावर आणले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर राहुल शर्मा हा आपल्या गावी परतण्यासाठी निघाले असता, आरोपींनी त्यांना अडवले आणि ॲडव्हान्स रक्कम परत करण्याची मागणी केली.
यावेळी आरोपींनी राहुल यांस शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना गावी जाण्यापासून रोखले. या मानसिक त्रासाला कंटाळून राहुल शर्मा यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. राहुल शर्मा याचे वडील विजय महेश शर्मा यांनी २९ ऑगस्ट २०२४ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३४१ (अन्यायकारकरीत्या अडवणे), ३२३ (इजा करणे) आणि १४३ (गैरकायदेशीर जमाव) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.