लोहारा – तालुक्यातील सास्तुर येथे हृदयद्रावक घटना घडली असून, पतीच्या सततच्या छळाला कंटाळून आई आणि मुलीने एकत्र आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दि. 14 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 दरम्यान, मयत अलका उमाकांत माने आणि निकीता उमाकांत माने या दोघींनी सास्तुर ते उदतपूर दरम्यान असलेल्या कूनळ येथील पाण्यात उडी मारून जीवन संपवले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी उमाकांत बाबुराव माने हा सतत मद्यपान करून पत्नी आणि मुलीला विनाकारण मारहाण करत होता. शारीरिक आणि मानसिक छळ सहन न झाल्याने अलका आणि निकीताने टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणी मारुती लिंबाजी वाघमोडे (वय 70, रा. कुनाळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात आरोपी उमाकांत बाबुराव माने विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 107, 108, 85, 115(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने सास्तुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.