धाराशिव – मित्राविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सह-आरोपी न करण्याच्या मोबदल्यात एका शेतकऱ्याकडून तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून, १० तोळ्यांचे सोन्याचे कडे आणि ४ लाख रुपये उकळल्यानंतरही, आणखी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लोहारा पोलीस ठाण्यातील प्रभारी सहायक पोलीस निरीकासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.
ही धडक कारवाई मंगळवारी (दि. ११) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास लोहारा तालुक्यातील भातागली येथे तक्रारदाराच्या शेतात करण्यात आली. या घटनेमुळे धाराशिव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे (वय ४३), पोलीस शिपाई आकाश मधुकर भोसले (वय ३२), पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे (वय ३४) आणि सहायक फौजदार निवृत्ती बळीराम बोळके (वय ५७) या चौघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुणे एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय शेतकरी तक्रारदाराने दि. ६ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात तक्रारदाराला सह-आरोपी न करण्यासाठी वरील चौघा लोकसेवकांनी त्याच्याकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराकडे त्यावेळी पैसे नसल्याने त्याने स्वतःचे १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले, जे या आरोपींनी ठेवून घेतले. त्यानंतरही आरोपींनी तक्रारदाराच्या भावाकडे जाऊन त्याच्याकडून परस्पर ४ लाख रुपये घेतले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी तक्रारदाराकडे आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली.
असा रचला सापळा
आरोपींनी ४ लाख रुपये आणि १० तोळ्यांचे कडे घेतल्यानंतरही, एपीआय कुकलारे यांनी तक्रारदाराकडे आणखी २ लाख रुपयांची लाच मागणी केली आणि ती रक्कम पोलीस नाईक तिघाडे किंवा पोलीस शिपाई भोसले यांच्याकडे देण्यास सांगितले.
या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने या तक्रारीची ६, ७ आणि १० नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. यात पैसे आणि सोन्याचे कडे घेतल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, मंगळवारी (दि. ११) सायंकाळी भातागली येथील तक्रारदाराच्या शेतात सापळा लावण्यात आला. यावेळी, एपीआय कुकलारे यांच्या सांगण्यावरून पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे याने तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
चौघांवर गुन्हा दाखल, पथके घरझडतीसाठी रवाना
या कारवाईनंतर चौघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी तिघाडे याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम २ लाख रुपये आणि एक मोबाईल फोन सापडला. तर, एपीआय कुकलारे यांच्या अंगझडतीत रोख २,४३८ रुपये, भोसले याच्याकडे २,३०० रुपये आणि बोळके याच्याकडे ६०० रुपये रोख आणि सर्वांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तसेच, आरोपींच्या घराची झडती घेण्यासाठी एसीबीची पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पर्यवेक्षणाखाली, सोलापूर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले आणि पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने केली.






