लोहारा, धाराशिव: तालुक्यातील जेवळी येथील बसवेश्वर चौकात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आपली वाहने उभी करणाऱ्या तीन वाहनचालकांवर लोहारा पोलिसांनी कारवाई करत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होत ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास घडली. जेवळी येथील बसवेश्वर चौकात, जो एक वर्दळीचा रस्ता आहे, तिथे काही वाहने धोकादायकरित्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, आरोपी करीम रहीमान सगरी (वय २३) याने रिक्षा (क्र. एमएच २५ ई ५५०३), बसवराज विश्वनाथ तावशे (वय ३८) याने रिक्षा (क्र. एमएच २३ एक्स ४३४८) आणि मारुती अरुण जाधव (वय २४) याने आपली ओमिनी व्हॅन (क्र. एमएच १३ एसी ६१८२) रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभ्या केल्याचे आढळून आले.
या बेजबाबदार कृत्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता होती. याची गंभीर दखल घेत लोहारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन वरील तिन्ही वाहनचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ आणि मोटार वाहन कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसणार असून, नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर लावताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.