लोहारा – कत्तलीच्या उद्देशाने पिकअप वाहनातून दोन गायी व एका बैलाची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या कर्नाटकच्या एका तरुणावर लोहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी (दि. ४) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लोहारा-जेवळी रस्त्यावर केली. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी यशवंत तुळजाप्पा अलुरकर (वय २४, रा. रिक्कनेअलुर, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा-जेवळी रस्त्यावर असलेल्या कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ एक पिकअप वाहन (क्र. केए ३२ एए १६१०) संशयास्पदरीत्या जात होते. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जातीच्या दोन जर्सी गायी आणि एक बैल कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले.
या जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना निर्दयतेने कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची तीन जनावरे आणि वाहन असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत अलुरकर याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.