लोहारा: शहरातील मुख्य चौकांमध्ये रहदारीस धोकादायक ठरेल आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांवर लोहारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
ही कारवाई रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:२० ते ११:३० च्या दरम्यान करण्यात आली. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीहरी विठ्ठल पोतदार (वय ६५, रा. मार्डी) यांनी आपला छोटा हत्ती (क्र. एमएच १३ एसी ६९३६) रहदारीस धोकादायकरीत्या उभा केलेला पोलिसांना आढळून आला.
त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शंकर बबन गुरव (वय ४०, रा. वडगाव दरे, ता. तुळजापूर) यांनी आपली रिक्षा (क्र. एमएच २३ एक्स २३०४) रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता.
गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्याने, त्यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. यावरून दोन्ही वाहनचालकांविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८५ आणि मोटार वाहन कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.