परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे प्रेमसंबंधाच्या कारणावरून १८ वर्षीय तरुणावर अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, सात जण अद्याप फरार आहेत.
काय आहे प्रकरण?
भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली बाबासाहेब गिरी (१८) याचे परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील एका विवाहित महिलेच्या सोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे नाते मुलगी वडाचीवाडी येथे मामाकडे शिक्षणासाठी असताना शाळेत जुळले होते. लग्नानंतरही त्यांचा संपर्क सुरूच राहिला.
३ मार्च रोजी व्हॉट्सअॅपद्वारे दोघांमध्ये भेटण्यासंदर्भात संवाद झाला. हा संवाद मुलीच्या पतीच्या हाती लागला. त्याने तिचा मोबाईल ताब्यात घेत माऊली गिरी याला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. माऊली गिरी आल्यानंतर त्याला घरात कोंडून, मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि इतर चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला पांढरेवाडी गावालगतच्या रस्त्यावर फेकून दिले.
या घटनेची माहिती केळेवाडीचे पोलीस पाटील यांनी माऊली गिरी याचे वडील बाबासाहेब गिरी यांना दिली. त्यांनी तातडीने जखमी मुलाला जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. १४ दिवस उपचार सुरू असताना किडनी आणि शरीराच्या इतर भागांवर झालेल्या गंभीर दुखापतींमुळे रविवारी सकाळी १०.३० वाजता माऊली गिरी याने शेवटचा श्वास घेतला.
चार आरोपी अटकेत, सात जण फरार
या घटनेबाबत बाबासाहेब गिरी यांनी अंबी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सतीश जगताप (रा. पांढरेवाडी), राहुल मोहिते (रा. पांढरेवाडी, परंडा), आकाश मगर (रा. शेळगाव, परंडा) आणि विजय पाटील (रा. सोनारी, परंडा) यांना अटक केली आहे. इतर सात आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष खरड आणि पीएसआय ज्ञानेश्वर घाटगे करत आहेत. पोलिसांनी आता ही केस खूनप्रकरण म्हणून तपासायला सुरुवात केली असून, उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पहिल्या मुलाची आत्महत्या, दुसऱ्याची हत्या
दोन वर्षांपूर्वीच बाबासाहेब गिरी यांच्या मोठ्या मुलाने आत्महत्या केली होती. बाबासाहेब गिरी यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून, दुधडी गावकऱ्यांनी वर्गणी करून माऊली गिरी यांच्या उपचारासाठी पैसे पाठवले होते. परंतु त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरील घटनेचा तपास करून सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.