धाराशिव: चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या मोठ्या नुकसानीचा सामना करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २,३४,९५५ शेतकऱ्यांसाठी १८९ कोटी ६० लाख ६७ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, अशी माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, २४ मे पासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले आणि पशुधनही वाहून गेले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पहिला प्रस्ताव १५ ऑगस्ट रोजी शासनाकडे पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.
या शासन निर्णयानुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ८,५०० रुपये मदत दिली जाणार असून, ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत असेल. मदतीचे वितरण लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
तालुकानुसार जाहीर झालेली मदत खालीलप्रमाणे:
- धाराशिव: ४३,०६५ शेतकरी – ३९ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये
- कळंब: ६१,८७४ शेतकरी – ५० कोटी ८८ लाख ८६ हजार रुपये
- भूम: ४३,२७६ शेतकरी – २८ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये
- वाशी: ३७,५७५ शेतकरी – २५ कोटी ६४ लाख १२ हजार रुपये
- तुळजापूर: २४,११० शेतकरी – २२ कोटी ६९ लाख ८७ हजार रुपये
- लोहारा: २३,२५९ शेतकरी – २१ कोटी ८६ लाख ३ हजार रुपये
- परंडा: १,२९४ शेतकरी – ५२ लाख १६ हजार रुपये
- उमरगा: ५०२ शेतकरी – १३ लाख ३२ हजार रुपये
पहिल्या टप्प्यातील मदत जाहीर झाली असली तरी, नुकसानीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रस्तावही लवकरच शासनाला सादर करून जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.