विस्थापित मराठ्यांचे नवे आशास्थान मनोज जरांगे पाटील यांनी वेळेवर उपोषण मागे घेऊन राज्यभरातील जनतेची दिवाळी गोड केली. मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याने सत्ताधारी घाबरले होतेच परंतु जनतेच्या मनातही भीती निर्माण झाली होती. बीड मधील दंगलीचे आणि जाळपोळीचे लोण हे राज्यभर पसरेल अशी भीती सर्वांच्या मनात होती. चांद्यापासून बांद्यापर्यंतची जनता भीतीच्या सावटाखाली होती.
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा आणि तालुका पातळीवर पुढार्यांना केलेली गाव बंदी हिंसक स्वरूप घेत होते. बीड जिल्ह्यातील हिंसक घटना पाहता मराठा आंदोलन आपले आंदोलन कोणत्या दिशेने नेऊ पाहत आहेत असा प्रश्न विचारला जात होता. एका बाजूला गांधीजीनी दिलेल्या अस्त्राचा वापर करून नेत्यांनी उपोषण करायचे आणि कार्यकर्त्यांनी जाळपोळ करायची? असा प्रश्न या आंदोलनाला सहानुभूती असलेल्या लोकांना पडत होता.
मनोज जरांगे यांचे पहिले उपोषण हे खऱ्या अर्थाने यशस्वी झाले होते. सरकार जाळपोळीला घाबरत नाही तर उपोषणाच्या अस्त्राला घाबरते हे या आंदोलनातून सिद्ध झाले आहे. उलट जाळपोळ झाल्यामुळे सरकारचे काम सोपे होत आहे. आंदोलन कुठे सुरू करायचे आणि कुठे थांबवायचे हे समजणारच नेता यशस्वी होतो. जरांगे यांनी योग्यवेळी पाणी पिण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर योग्य वेळी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. अन्यथा या आंदोलनाला वेगळे वळण लागले असते. बीड मधील जाळपोळीचे लोण राज्यभर पसरते की काय अशी भीती सरकारला होती. परंतु जरांगे यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढील प्रसंग टळले.
परंतु पुरोगामी महाराष्ट्रात या आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे. अजित पवार समर्थक मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची बाजू घेऊन वक्तव्य करण्यास सुरुवात केल्यामुळे आता पुढे ही लढाई ओबीसी विरुद्ध मराठा असे वळण घेते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. यापूर्वी समता परिषदेच्या शक्तिप्रदर्शन मेळाव्यात भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. परंतु मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर भुजबळ यांनी बीड शहराला भेट दिली. भुजबळ यांच्यासारख्या परिपक्व नेत्याने मराठा आणि ओबीसी समाजात दरी पडेल अशी वक्तव्य केली. विशेष म्हणजे भुजबळ यांच्यासारख्या परिपक्व नेत्याकडून ही अपेक्षा नाही.
आता या लढाईला छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असे स्वरूप येत आहे. मुळात आरक्षण हे मिळणारच नाही. मात्र मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध अनुसूचित जाती, मराठा विरुद्ध अनुसूचित जमाती अशी भांडणे सुरू होणार आहेत. अरे म्हणजे यापूर्वी मराठी आरक्षणाच्या लढाईला बळ देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गप्प का आहेत ?तेच समजत नाही. छगन भुजबळ यांच्या भूमिकेला त्यांचा मूक पाठिंबा आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
या घटनांमुळे महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार हे निश्चित आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना निवडणुका जिंकण्यासाठी हे राजकारण हवे आहे. निवडणुका येतील आणि जातील मात्र पुरोगामी महाराष्ट्राचे बिघडलेले स्वास्थ्य कोणीही नीट करू शकणार नाही. जरांगे विरुद्ध भुजबळ यांच्या लढाईनंतर सर्वच राजकीय पक्षांनी अर्थात त्यांच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन ही भांडणे मिटवायला हवी.
छगन भुजबळ हे लोकनेते आहेत. त्यांच्यासारख्या परिपक्व नेत्याने एखाद्या समाजाची बाजू घेऊन जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये. मनोज जरांगे यांनीही भुजबळ यांच्या वयाचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांच्या विरोधातील वक्तव्य करणे टाळली तर सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही. कुणी सुरुवात केली याचा उहापोह न करता दोघांनी एक एक पाऊल मागे घेतले तर समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही.
– नितीन सावंत
9892514124