मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना भविष्यात अधिक सुरक्षित आणि वक्तशीर प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी एसटीच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा “स्मार्ट बसेस” दाखल होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. नवीन तीन हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने आयोजित बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि संबंधित खाते प्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित कॅमेरे, जीपीएस प्रणाली, एलईडी टीव्ही, वाय-फाय सुविधा, चालकांसाठी ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा आणि चोरी-प्रतिबंधक बस लॉक सिस्टीम (anti-theft technology) यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. या तंत्रज्ञानामुळे बसेस अधिक सुरक्षित आणि आरामदायी होतील.
सुरक्षेवर विशेष भर:
स्वारगेट बसस्थानकावरील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. प्रवासात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे केवळ प्रवाशांच्या सुरक्षेवरच नव्हे, तर चालकाच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवरही ‘तिसरा डोळा’ म्हणून लक्ष ठेवणार आहेत. तसेच, बसस्थानक परिसरात आणि ‘पार्किंग’मध्ये उभ्या असलेल्या बसेस पूर्णपणे बंद राहतील अशी यंत्रणाही बसमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे.
एलईडी टीव्हीद्वारे माहिती आणि महसूल वाढ:
नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातींसोबतच विविध महत्त्वाच्या घडामोडी, तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे संदेश तात्काळ प्रवाशांपर्यंत पोहोचवले जातील. यामुळे प्रवासातही प्रवासी जगभरातील घडामोडींबाबत अद्ययावत राहतील. याशिवाय, बसच्या बाहेरील बाजूसही जाहिरात प्रसिद्धीसाठी एलईडी पॅनल लावले जाणार असून, यातून महामंडळाच्या जाहिरात महसुलात वाढ होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
आग प्रतिबंधक यंत्रणा:
सध्या वाढत्या तापमानामुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाय म्हणून नवीन बसेसमध्ये ‘फोम बेस’ आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा बसमध्ये ज्या ठिकाणी आग लागेल, त्याचा शोध घेऊन तात्काळ फोमच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम करेल.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवासी सुरक्षेसोबतच बस अपघातांची संख्या कमी होण्यास आणि बस फेऱ्यांची वक्तशीरता वाढण्यास मदत होईल. यामुळे भविष्यात एसटी खऱ्या अर्थाने “स्मार्ट” बनेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.