मा. मुख्यमंत्री साहेब ,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
विषय: महाराष्ट्रातील खंडणीखोरीच्या वाढत्या सावटावर तातडीने कठोर कारवाईची गरज
सन्माननीय महोदय,
महाराष्ट्राचा लौकिक हा देशातील प्रगत आणि औद्योगिक राज्य म्हणून ओळखला जातो. परंतु, सध्याच्या परिस्थितीत हा लौकिक धोक्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने केवळ एका गावातील गुन्हेगारीचा नाही, तर संपूर्ण राज्याच्या प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्था व्यवस्थेच्या गळ्याला लागलेली वाळवी दिसून आली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता एकच कटु सत्य अधोरेखित होत आहे – “राजकीय खंडणीखोरी ही आता व्यवस्थेचा भाग बनली आहे!”
ग्रामपंचायत सदस्यांपासून आमदार-खासदारांपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खंडणीखोरीचा बाजार तेजीत आहे. उद्योग असो, बांधकाम प्रकल्प असोत, मोठ्या गुंतवणुकीचे प्रस्ताव असोत, कुठल्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्थानिक गुंडांच्या माध्यमातून “हफ्ता” दिल्याशिवाय काहीही शक्य नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : खंडणीखोरीच्या महासंक्रमणाचा धोक्याचा इशारा
संतोष देशमुख हे सरपंच असूनही, त्यांनी खंडणीखोरीच्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्यांची निर्घृण हत्या झाली. हा गुन्हा महाराष्ट्रातील पोलिसांच्या लाचारीचं आणि राजकीय वरदहस्ताचं ज्वलंत उदाहरण आहे. परळी तालुक्यातील कराड गँगने त्यांच्या व्यापाराच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला भीतीदायक उदाहरण करण्याचं ठरवलं आणि परिणामी हा क्रूर प्रकार घडला.
परंतु, केवळ बीड जिल्ह्यातच हा प्रकार होत आहे असं नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर अशा असंख्य गुंड टोळ्या राजकीय पाठींब्यावर बळावल्या आहेत. पुण्याजवळची चाकण एमआयडीसी, हिंजवडी, तळेगाव, औरंगाबाद, नाशिक, तुर्भे, तळोजा या भागांमध्ये अशा टोळ्यांचा पूर्ण दबदबा आहे. उद्योगांवर जबरदस्तीने वर्चस्व मिळवण्यासाठी ‘हफ्ता’ देण्याची सक्ती केली जाते.
महाराष्ट्राचा औद्योगिक अधःपात सुरू झाला आहे
हे सगळं पाहता महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.
- नवीन गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे पाठ फिरवत आहेत.
गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा ही राज्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करत आहेत. पण महाराष्ट्रात काय होते आहे? इथे उद्योगांना संरक्षण मिळण्याऐवजी गुंड आणि राजकीय हस्तकांकडून जबरदस्तीने पैसे लुटले जात आहेत. - पोलीस खात्याची गुन्हेगारीशी असलेली अभद्र युती.
गुन्हेगारांना राजकीय अभय आहे आणि पोलिसांवर दबाव आहे. परिणामी, सरळ मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांना कोणीच मदत करत नाही. - गुन्हेगारांसाठी उद्योग हा लुटीचा नवा पर्याय बनला आहे.
आधी अंडरवर्ल्ड मुंबईत प्रॉपर्टी आणि फिल्म इंडस्ट्रीवर हफ्ता घेत असे. आता हाच ट्रेंड संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे. आता टार्गेट उद्योगधंदे आणि व्यावसायिक झाले आहेत.
मुख्यमंत्री महोदय, ही वेळ आहे कठोर निर्णय घेण्याची!
आपण महाराष्ट्राच्या हितासाठी पुढील ठोस पावलं उचलायला हवीत –
- विशेष तपास पथक (SIT) स्थापन करा – महाराष्ट्रातील सर्व मोठ्या औद्योगिक केंद्रांमधील खंडणीखोरीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी.
- गुंडगिरीला राजकीय पाठबळ देणाऱ्यांवर कारवाई करा – कोणत्याही राजकीय व्यक्तीचा किंवा स्थानिक नेत्याचा अशा टोळ्यांशी संबंध आढळल्यास कठोर पावले उचला.
- उद्योगांसाठी विशेष संरक्षण यंत्रणा उभारावी – औद्योगिक वसाहतींमध्ये स्वतंत्र सुरक्षा कक्ष स्थापन करावा, जेणेकरून कोणत्याही उद्योजकाला कोणत्याही गँगने धमकावू नये.
- अंडरवर्ल्ड बिमोड करणाऱ्या धोरणांची पुनरावृत्ती करा – नव्वदच्या दशकात मुंबई पोलिसांनी आणि सरकारने ज्या कठोर उपाययोजना केल्या, त्याच धर्तीवर ही गुन्हेगारी मोडून काढावी.
- खंडणीसंदर्भात विशेष कायदा करा – खंडणीखोरी आणि उद्योगधंद्यांना धमकावणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल असा वेगळा कायदा बनवा.
महाराष्ट्र अजून किती दिवस असहाय्य बसेल?
मुख्यमंत्री महोदय,
आपल्याकडे हा विषय गांभीर्याने घेण्याशिवाय पर्याय नाही.
जर आजच योग्य पावलं उचलली नाहीत, तर उद्या महाराष्ट्राचा पूर्णतः गुंडराज्यात रूपांतर होईल. खंडणीखोरी आणि गुन्हेगारीमुळे नवे उद्योग महाराष्ट्रात येणार नाहीत, आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.
ही वेळ आहे निर्णय घेण्याची. आज जर आपण हे थांबवू शकलो नाही, तर उद्या महाराष्ट्राला उभं करण्यासाठी आपल्यालाच मोठी किंमत मोजावी लागेल.
आपली भूमिका काय?
महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी आपण ठोस निर्णय घेणार का? की पुन्हा एकदा निवडणुकीचे हिशेब मांडून यावर पडदा टाकला जाणार?
हे पत्र केवळ एका पत्रकाराने लिहिलेलं नाही.
हे पत्र त्या प्रत्येक उद्योजकाचं, त्या प्रत्येक व्यापाऱ्याचं आणि सामान्य नागरिकाचं प्रतिनिधित्व करत आहे, जो महाराष्ट्राला पुढे जाताना पाहू इच्छितो.
आपल्या ठोस कृतीची प्रतीक्षा,
– बोरूबहाद्दर