धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा पूर्णपणे फज्जा उडाला असतानाच, आता शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपने सर्व ४१ जागांवर उमेदवार देऊन ‘पाठीत खंजीर खुपसल्याचा’ गंभीर आरोप जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे खुद्द पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी साळुंखे यांचे हे म्हणणे खोडून काढत, “घाईघाईने स्टेटमेंट देण्यापेक्षा वरिष्ठांशी चर्चा करायला हवी होती,” असे म्हणत त्यांनाच ‘घरचा आहेर’ दिल्याने राजकीय वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक, सुरज साळुंखे आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत १७ जागा शिंदे गटाला आणि २४ जागा भाजपला देण्याचे ठरले होते. या फॉर्म्युल्यावर विश्वास ठेवून साळुंखे यांनी १७ उमेदवारांना एबी फॉर्मही वाटले. मात्र, ऐनवेळी भाजपने ४१ च्या ४१ जागांवर उमेदवार देऊन शिंदे गटाला धक्का दिला. यामुळे संतापलेल्या सुरज साळुंखे यांनी, “भाजप आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मित्रपक्षाचा विश्वासघात केला आहे,” असा घणाघाती आरोप केला.
पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका!
जिल्हाप्रमुख इतके आक्रमक झालेले असतानाच, आज धाराशिवमध्ये आलेले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. भाजपने दगाफटका केल्याच्या साळुंखे यांच्या आरोपावर बोलताना सरनाईक म्हणाले की, “सुरज साळुंखे यांनी असे जाहीर वक्तव्य करण्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते.” तसेच, “धाराशिव नगर परिषद म्हणजे संपूर्ण जिल्हा नव्हे. जिल्ह्यातील कळंब आणि नळदुर्ग येथे आमची भाजपसोबत सन्मानजनक युती झाली आहे,” असे सांगत त्यांनी साळुंखे यांच्या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
एकीकडे जिल्हाप्रमुखांनी भाजपवर ‘युतीधर्म’ मोडल्याचा आरोप करत रणशिंग फुंकले आहे, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी “मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतो,” असे सांगत मवाळ भूमिका घेतली आहे. नेत्यांच्या या परस्परविरोधी भूमिकेमुळे शिंदे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. धाराशिव शहरात युती तुटली हे वास्तव असताना, पालकमंत्री नक्की कोणाची बाजू सावरून धरत आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पुढील दिशा काय?
धाराशिव शहरात आता भाजप विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना रंगणार, की पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर काही पडद्यामागच्या हालचाली होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







