धाराशिव महावितरण कार्यालयात भ्रष्टाचाराचा स्फोटक प्रकार समोर आला असून, प्रभारी कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. महावितरणच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये गडबड करून कंपन्यांच्या संगनमताने मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी केला आहे.
लाच घेतली आणि बनावट गेट पास!
मे २०२४ मध्ये महावितरणच्या नादुरुस्त रोहित्रांच्या दुरुस्तीचे कोटी-दीड कोटींचे कंत्राट काही एजन्सींना देण्यात आले. पण कुलकर्णी मॅडम यांनी महाराष्ट्र शासनाच्या विद्युत ठेकेदार परवान्यांची तपासणी न करता बनावट गेट पासच्या आधारे बिले प्रमाणित केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या बिलांच्या मंजुरीसाठी तब्बल २० टक्के लाच घेतल्याचे आरोपपत्रात स्पष्ट नमूद आहे!
भाऊबंदकी आणि निवडक ठेकेदारांना मोठी कामे!
सबस्टेशन मेंटेनन्सच्या कामांसाठी निवडलेल्या १०-१२ एजन्सींपैकी केवळ दोन – अजिंठा इलेक्ट्रिकल आणि लिनिअर इंटरप्रायजेस – यांना कोट्यवधींची कामे मिळाली. इतकंच नाही, तर या एजन्सींच्या बड्या ठेकेदाराशी कुलकर्णी मॅडम यांचे अलिखीत पार्टनरशिप असल्याचेही समोर आले आहे. कामांची वर्क ऑर्डर मंजूर करण्यासाठी तब्बल २५ टक्के कमिशन घेतल्याचा आरोप आहे!
बिनअनुभवी कंपन्यांना लाच घेऊन पात्र ठरवले!
महावितरणच्या टेंडर प्रक्रियेत चक्क दोन-दोन लाखांची लाच घेऊन अनुभव नसलेल्या कंपन्यांना पात्र ठरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यालयाने ३१ मार्च २०२४ पर्यंत मंजूर केलेल्या एजन्सींना कोणतेही वैध कागदपत्र नसताना लाखोंची कामे कशी दिली गेली, हा मोठा प्रश्न आहे.
१४ कोटींचा निधी एका कंपनीच्या घशात!
महावितरणच्या नियमांनुसार ४० एजन्सींमध्ये समान प्रमाणात निधी विभागला पाहिजे होता. मात्र, कुलकर्णी मॅडम यांनी ‘यश इलेक्ट्रिकल्स’ला तब्बल ३.२५ कोटींची कामे एकट्याने दिली. त्याबदल्यात त्यांनी १० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप आहे.
स्वतःच्या शेतासाठी वीजबिलातही घोटाळा!
सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे, कुलकर्णी मॅडम यांनी स्वतःच्या शेतातील कृषीपंपाच्या बिलातही फेरफार केला. महावितरणच्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना बिले दुरुस्त करून देण्यास नकार दिला जातो, पण स्वतःच्या बिलात मात्र थकबाकी माफ करून घेतली गेली!
सरकारी सोलार योजनेंतर्गत स्वतःच्या शेतात ५ सोलार पंप!
नियमांनुसार, ज्यांचे कृषीपंप कनेक्शन आहे त्यांना सोलार योजना मिळू शकत नाही. मात्र, कुलकर्णी मॅडम यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी योजनेतून स्वतःच्या शेतात ४-५ सोलार पंप बसवून घेतले. यासाठी सोलार एजन्सींवर दबाव टाकल्याचेही समोर आले आहे.
सखोल चौकशी आणि निलंबनाची मागणी!
या सर्व प्रकारांमुळे शासनाचा आणि जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. त्यामुळे कुलकर्णी मॅडम यांची त्वरित चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महावितरणच्या या भ्रष्टाचार प्रकरणात लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!