जळकोट – धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम महायुती सरकारने साकारले आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीला जे जमले नाही, ते महायुतीने करून दाखवले आहे. केवळ तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक निर्णय यापूर्वीच महायुतीने सरकारने घेतले आहेत. त्यामुळे आता तालुक्याचा आणि जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विश्वास व्यक्त केला.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय 23 वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतला. महायुती सरकारने त्यासाठी आता 11 हजार 700 कोटी रूपयांची मान्यता दिली आहे. आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात भर पडणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सुरू केलेले हे काम आपण मोठ्या जबाबदारीने पूर्णत्वाकडे आणले असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पहिली बसवसृष्टी नळदुर्ग येथे आपण साकारत आहोत. त्यासाठी पाच एकर जागा उपलब्ध झाली आहे. पाच कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठीही अडीच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नळदुर्ग येथे शादीखाना उभारण्यासाठी दोन कोटी उपलब्ध झाले असून या कामाचे भूमिपूजनही पूर्ण झाले आहे. जळकोट येथील बाबनवली दर्ग्यासाठी 10 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुळजापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी 50 कोटी रूपयांचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रूपयांची कामे सुरू केली आहेत. त्यातून मंदिराचा जीर्णोध्दार आणि मुख्य महाद्वारासह शहरात भव्य कमानी साकारल्या जाणार आहेत.
अनेक महत्वपूर्ण प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. काही प्रगतीपथावर आहेत. तर उर्वरित योजना आणि प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि सोबतीची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत आपल्याला काय मिळाले, याचा सर्वांनी विचार करावा. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात धाराशिव जिल्हा आणि आपल्या मतदारसंघात काय केले, याचा कार्य अहवाल आपल्या सर्वांसमोर मांडला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी नंदगाव येथील 40 पेक्षा अधिक जणांनी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जळकोटसह हंगरगा, बोरगाव, लोहगाव, मुर्टा, होर्टी, किलज, सलगरा यासह तांडे आणि वाड्या-वस्त्यावरील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
66 कोटींचा मावेजा मंजूर केल्याबद्दल गडकरींचे धन्यवाद
ज्यांची जमीन नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाच्या रूंदीकरणासाठी संपादीत केली आहे, त्या शेतकरी कुटुंबीयांचे नुकसान होऊ नये या उदात्त भावनेने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 66 कोटी रूपयांचा मावेजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मार्गावरील शेतकरी बांधवांसाठी मोठ्या तळमळीने गडकरी साहेबांनी घेतलेल्या या क्रांतीकारी निर्णयाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.