तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात एका २४ वर्षीय तरुणाला तिघा जणांनी मिळून बेदम मारहाण करून त्याच्याजवळील रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र हनुमंत लांडगे (वय २४, रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर) असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंदफळ शिवारातील खंडोबाच्या माळावरील मंदिराच्या पाठीमागे, श्रीकांत कुलकर्णी यांच्या विहिरीजवळील पुलावर ही घटना घडली.
लांडगे हे त्या ठिकाणी असताना आरोपी विकास जाधव, राजा देवसिंग जाधव (दोघेही रा. ढेकरी, ता. तुळजापूर) आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार तेथे आले. “तू लय माजलास काय,” असे म्हणत त्यांनी लांडगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने आणि कोयत्याने लांडगे यांना जबर मारहाण करून जखमी केले.
एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी लांडगे यांच्या खिशातील ४२,५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेनंतर दोन दिवसांनी, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी राजेंद्र लांडगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५), आणि ११९(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.