परंडा : सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून गोंधळ घालणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. परंडा पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी परंडा शहरातील शिवाजी चौक परिसरात घडली.
प्रशांत आप्पा गरड (वय २६, रा. कात्राबाद, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये प्रशांत गरड हा प्रवास करत होता. बस परंडा-बार्शी रोडवरील शिवाजी चौकात आली असता, गरड याने मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याच्या या कृत्यामुळे बसमधील इतर प्रवाशांना आणि वाहकाला नाहक त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, त्याच वेळी गस्तीवर असलेल्या परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाला हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ बसमध्ये जाऊन प्रशांत गरड याला ताब्यात घेतले. याप्रकरणी, पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.