धाराशिव: धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करून नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय ३५) आणि साक्षी श्रीकृष्ण टेकाळे (वय २८) अशी मृत दांपत्याची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण आणि साक्षी यांचा विवाह सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी झाला होता. सकाळी दोघांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात श्रीकृष्णने पत्नी साक्षीला जबर मारहाण केली, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर, मानसिक धक्क्यातून श्रीकृष्णने घरातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असल्याची माहिती आहे, मात्र त्यातील मजकूर गोपनीय ठेवण्यात आला आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली की यामागे आर्थिक विवंचनेसारखे दुसरे काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
या तरुण जोडप्याच्या अशा दुर्दैवी अंतामुळे कोल्हेगाव आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, धाराशिव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.