धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरने रुग्णांच्या जीवाशी खेळत त्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. रमेश लबडे असे या बनावट डॉक्टरचे नाव असून त्यांनी ओमसाई हॉस्पिटल व नशा मुक्ती केंद्र या नावाने हॉस्पिटल सुरू केले होते. या हॉस्पिटलमध्ये तो कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय रुग्णांवर उपचार करत होता.
विश्वजीत भास्कर भोसले यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. लबडे हे रुग्णांना इंजेक्शन, सलाईन देणे आदी उपचार करत असून व्यसनमुक्तीसाठी रुग्णांकडून प्रत्येकी ९ ते १० हजार रुपये घेत होते. एका इंजेक्शनमध्ये पाच ते सहा इंजेक्शन भरून रुग्णांना देत असल्याने रुग्णांना शरीरात जाळ झाल्यासारखे होत होते आणि काही वेळासाठी बेशुद्ध पडत होते. रुग्णांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी डॉ. लबडे यांच्याकडे वैद्यकीय पदवीची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
यानंतर ग्रामस्थांनी विश्वजीत भास्कर भोसले यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने डॉ. लबडे यांच्या हॉस्पिटलची चौकशी केली. चौकशी दरम्यान, डॉ. लबडे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसल्याचे आणि त्यांच्या हॉस्पिटलची नोंदणीही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नसल्याचे निष्पन्न झाले.या घटनेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बनावट डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
बलात्काराचा गुन्हा दाखल
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील बोगस डॉक्टर डॉ. रमेश राजेंद्र लबडे याने एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यावेळी डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत असतानाच डॉक्टरने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या कृत्याचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर आरोपी डॉक्टर पीडितेला पुष्पविहार लॉजमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या पीडित महिलेने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेने पालकांसह तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी डॉ. रमेश राजेंद्र लबडे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम-64(2),351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भालेराव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे तुळजापूर परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉ. रमेश राजेंद्र लबडे हे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी सांगितले.