परंडा – भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे पहाटेच्या सुमारास ग्रामपंचायत जागेत गोवंशाची अवैध कत्तल करताना दोघांना परंडा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५ हजार रुपये किमतीचे संशयित गोमांस आणि कत्तलीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे.
परंडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२५ रोजी पहाटे सुमारे ५ वाजता माणकेश्वर गावातील कुरेशी गल्लीत रस्त्यावरील ग्रामपंचायतच्या जागेत काही व्यक्ती गोवंशाची कत्तल करत होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकला.
यावेळी रोह रियाज कुरेशी (वय १९ वर्षे, मूळ रा. सुभाष नगर कोरेगाव, सातारा, सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम) आणि शाहरुख मोहम्मद कुरेशी (वय २४ वर्षे, रा. माणकेश्वर, ता. भूम) हे दोघे गोवंशीय जनावरास कापून त्याची कातडी सोलत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून पोलिसांनी अंदाजे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे संशयित गोमांस, कत्तलीसाठी वापरलेला सत्तुर आणि चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी परंडा पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपी रोह कुरेशी आणि शाहरुख कुरेशी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम कलम ५ (क), ९, आणि ९ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंडा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.