धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समित्चे अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे(निवृत्त) आणि समितीच्या सदस्यांनी आज 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.
यावेळी, विभागीय आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कराळे, सामान्य प्रशासनचे उपायुक्त जगदीश मणियार, अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे, नगर परिषद प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामकृष्ण जाधवर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संग्राम जोगदंड ,भुम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, धाराशिव उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्या.श्री संदीप शिंदे यांनी 1948 पूर्वीचे आणि 1967 या दोन कालखंडातील शैक्षणिक अभिलेखे जन्म मृत्यू नोंदी अभिलेखे व भूमि अभिलेखे विभागाची काही अभिलेखे उर्दू व मोडी लिपी मध्ये असल्याने त्या अभिलेखांची तपासणी तज्ञांकडून काळजीपूर्वक करावी असे निर्देश दिले. उर्दू आणि मोडी भाषेचे जाणकारांची मदत घ्यावी तसेच अभिलेख तपासण्यापूर्वी त्यांना स्कॅन करून त्यांची प्रिंट काढावी असेही म्हणाले.
समिती पुढे धाराशिव जिल्ह्यातील विविध विभागातील अभिलेखांच्या नोंदी व कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदीचा तपशील जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यावेळी सादर केले . एकूण 4 लाख 49 हजार 131 नोंदीच्या तपासण्या करण्यात आल्या यामध्ये 459 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे अभिलेख शोधण्यासाठी 11 विभागातील 43 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या विवरणपत्रात माहिती संकलित करून करण्यात आली. या विवरणपत्रात सादर केलेली माहिती 1948 ते 1967 पूर्वीच्या कालावधीतील अभिलेखे तपासणी करून तयार करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 1948 पूर्वीचे निजामकालीन महसुली भूमी अभिलेखे शैक्षणिक व जन्म व मृत्यू नोंद वहयांची तपासणी करून समितीपुढे अहवाल सादर करण्यात आला.
नागरिकांना समितीपुढे आपल्या जवळील निर्देशीत केलेले पुरावे सादर करता यावेत यादृष्टीने दुपारी 2 ते दुपारी 4 हा वेळ समिती अध्यक्षांनी राखीव ठेवला होता. या वेळेत विविध संघटना व प्रतिनिधी यांनी समितीपुढे कागदपत्रे व पुरावे सादर केली. पुरावे सादर करतांना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राशी संबंधित उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी सादर करण्याचे आवाहन नागरिकांना यापुर्वीच केले होते. जिल्ह्यातील 18 व्यक्तींनी आपल्या जवळील पुरावे सादर केले आणी समितीला11 निवेदने सादर करण्यात आली.