नमस्कार मंडळी! मी तुमची लाडकी लाल परी! हो, हो! तीच ती एसटी. माझ्याशी तुमचं नातं जुने आहे. लहानपणी शाळेत जायचं, कॉलेजच्या कट्ट्यावर उभं राहायचं, आजोळी सुट्टीत धमाल करायला जायचं – या सगळ्या आठवणींमध्ये मी तुमच्या सोबत आहेच की! पण हल्ली माझी अवस्था अगदीच वाईट झालीय. मला म्हातारपण येतंय आणि माझी काळजी घेणारं कोणी नाही!
पालकमंत्री आले… नवी बसही आल्या!
माझ्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खात्याचा पदभार आहे. त्यांचा पहिला दौरा २५-२६ जानेवारीला झाला. तेव्हा त्यांनी मोठ्या दिलदारपणाने ५० नवीन बस देण्याचं वचन दिलं आणि पहिल्याच टप्प्यात २५ बस पाठवल्या. मग काय, लाल परीकडून पालकमंत्र्यांचं कौतुकच कौतुक!
आता दुसऱ्यांदा १९ फेब्रुवारीला ते पुन्हा धाराशिव दौऱ्यावर आले. काय योगायोग! शिवजयंतीचा दिवस आणि लाल परीचं नवसंस्कार घालून स्वागत! एवढंच नाही, तर पालकमंत्र्यांनी स्वतः सोलापूरहून धाराशिवपर्यंत एसटीने प्रवास केला! (हो, हो! माझ्यातच बसले ते!) त्यांच्यासोबत माजी आमदार ज्ञानराज चौगुले होते. त्यांनी सुद्धा तिकीट काढलं. अरे वा! मंत्री लोक तिकीट काढून प्रवास करू लागले म्हणजे खरंच परिवर्तनाचं वारे वाहू लागलंय!
लाल परीची दयनीय अवस्था!
पण ही फक्त गोष्टींची वरवरची बाजू आहे. वस्तुस्थिती काय आहे, हे ऐका! धाराशिव आगारातील तब्बल ८० टक्के बसेस भंगार झाल्यात. मला भर रस्त्यात बंद पाडणं, इंजिन गरम होऊन धूर काढणं, स्टेरिंग तुटणं – या गोष्टी आता रोजच्याच झाल्यात. गावखेड्यांतले रस्तेही चांगल्या अवस्थेत नाहीत, त्यामुळे प्रवास म्हणजे थरारक अनुभव असतो. एका बाजूला खड्डे आणि दुसऱ्या बाजूला मी, म्हणजे माझ्या प्रवाशांना हात जोडूनच प्रवास करावा लागतो. “बाळा, गाडीत चढतोय, पुढचा फोन जीवंत परतल्यावरच करीन!” अशी भावना असते.
माझा इतिहास… आणि भविष्यात काय?
पूर्वी माझा फार सन्मान होता. लाल परी म्हटलं की, लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट यायची. माझ्या आवाजावर गाव जागे व्हायचं, तरुण प्रेमी माझ्या खिडकीतून बाहेर बघत स्वप्न रंगवायचे, आणि ज्येष्ठ नागरिक माझ्या सीटवर बसून सुखद प्रवास करायचे. पण आता माझी अवस्था कुठल्या म्हाताऱ्या बैलासारखी झालीय. जुने पार्ट्स नाहीत, इंजिन गळतंय, आणि डागडुजीसाठी पैसाच नाही!
मंत्री साहेब, तुमच्या प्रवासाचा उपयोग होणार?
मंत्री साहेब, तुम्ही माझ्यात बसलात, प्रवास केलात, हे नक्कीच चांगलं. पण ही नवी बस फक्त शहरांमध्ये न ठेवता गावखेड्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आधीच अस्तित्वात असलेल्या बसेसची डागडुजी व्हायला हवी. नाहीतर तुमचा हा प्रवास केवळ छायाचित्रापुरता आणि लोकांना खूश करण्यापुरता राहील.
म्हणूनच सांगते, मी लाल परी बोलतेय… माझं ऐका रे! नाहीतर एक दिवस मी कायमची बंद पडेन आणि मग “कुठे गेली रे लाल परी?” असं विचारायला कुणीच नसेल!
- लेखन – सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह