येरमाळा: वारंवार फोन करून आणि शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या तरुणाला कंटाळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हळदगाव (ता. कळंब) येथे घडली होती. याप्रकरणी मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभेच्छा संजय खंडागळे (वय १७, रा. हळदगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर रोहीत सुरेश भोसले (रा. रामवाडी, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी रोहीत भोसले हा मयत सुभेच्छा हिच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तिला त्रास देत असे तसेच शिवीगाळ करत असे. या सततच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून सुभेच्छा हिने दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ९.१५ च्या सुमारास आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी आडूस गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेप्रकरणी मयत मुलीची आई वैशाली संजय खंडागळे (वय ४०, रा. हळदगाव) यांनी दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रोहीत भोसले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०७ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ७८, ७९ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO Act) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.






