उमरगा – उमरगा शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमरगा-लोहारा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांनी चिंता व्यक्त केली असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारांवर आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चौगुले यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उमरगा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालली आहे. १५ एप्रिल रोजी शहरात एका तरुणावर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची ताजी घटना आणि त्यापूर्वी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक झाल्याच्या घटनांचा त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. किरकोळ कारणांवरून मारहाण आणि हाणामारीचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या वाढत्या गुन्हेगारीचा फटका केवळ स्थानिक नागरिकांनाच बसत नाही, तर शेजारच्या कर्नाटक राज्यातून उपचार आणि खरेदीसाठी उमरग्यात येणाऱ्या नागरिकांवरही परिणाम होत आहे. सततच्या घटनांमुळे बाहेरचे नागरिक शहरात येण्यास कचरत आहेत, ज्यामुळे व्यापारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे, असे चौगुले यांनी नमूद केले. शिक्षणानिमित्त शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली आहे, कारण गुन्हेगारीच्या घटना महाविद्यालय आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात घडत आहेत.
पोलिस कारवाई करत असले तरी, काही गुन्हेगारांवर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न माजी आमदार चौगुले यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी कोणताही दबाव न बाळगता गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ नियंत्रण मिळवून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्याची विनंती चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.