धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील, विशेषतः तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणावरून आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी आणलेल्या ‘मकोका’ कायद्याच्या विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना, त्यांनी कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवले आणि जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
आमदार कैलास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुन्हा नोंद होऊनही अनेक मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांकडून समाधानकारक कारवाई झालेली नाही.
कायद्यातील पळवाटांवरून सरकारला सुनावले
विधेयकानुसार, ५० ग्रॅमपेक्षा जास्त (कमर्शियल क्वांटिटी) ड्रग्ज सापडल्यास आरोपीवर ‘मकोका’ लावण्याची तरतूद आहे. यावर आक्षेप घेत आमदार पाटील म्हणाले, “गुन्हेगारांना हे नियम माहीत आहेत. ते ५० ग्रॅमपेक्षा जास्त ड्रग्ज सोबत ठेवणार नाहीत आणि कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटतील.” त्यांनी सूचना केली की, केवळ कमर्शियल क्वांटिटीच नव्हे, तर २ ते ५० ग्रॅम (इंटरमीडियेट क्वांटिटी) ड्रग्ज सापडलेल्या आणि वारंवार गुन्हा करणाऱ्या तस्करांवरही ‘मकोका’ लावला पाहिजे. राज्यात कमर्शियल क्वांटिटीचे ११ हजार गुन्हे आहेत, तर अल्प प्रमाणातील ६३ हजार गुन्हे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तुळजापूर प्रकरणावरून पोलिसांना धारेवर धरले
तुळजापूरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आमदार पाटील यांनी संशय व्यक्त केला. ते म्हणाले, “पोलिसांनी १४ फेब्रुवारीला ४५ ग्रॅम, ४ मार्चला १० ग्रॅम आणि ५ मार्चला ८ ग्रॅम ड्रग्ज पकडले. तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये जाणीवपूर्वक एकूण प्रमाण ५० ग्रॅमच्या पुढे जाऊ दिले नाही. आपण कायदे चांगले करतो, पण अंमलबजावणी करणारी यंत्रणाच गुन्हेगारांना हाताशी धरते.”
या प्रकरणातील मुंबईचे मुख्य तस्कर संगीता गोळे, वैभव गोळे आणि अतुल अग्रवाल यांची नावे आरोपपत्रात असूनही ते मोकाट कसे, असा सवाल त्यांनी केला. “अतुल अग्रवालचा मोबाईल नंबर पोलिसांकडे आहे, तो फोन चालू आहे आणि तो खुलेआम फिरत आहे. मग पोलीस त्याच्यापर्यंत का पोहोचू शकले नाहीत?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यंत्रणेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल
परंडा येथील एका प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले की, ड्रग्ज म्हणून जप्त केलेला नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी होमगार्डमार्फत पाठवला गेला आणि त्याचा अहवाल ‘कॅल्शियम क्लोराईड’ असा आला. “नमुना कोणी बदलला? यावरून यंत्रणेतील भ्रष्टाचार उघड होतो. कायदा कितीही चांगला असला, तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा प्रामाणिक नसेल, तर त्याचा उपयोग नाही,” असे खडे बोल त्यांनी सुनावले.
यासोबतच, ग्रामीण भागातील दारू, हातभट्टी आणि गुटखा तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक झाल्यानंतर लगेच जामीन मिळतो आणि ते पुन्हा तेच गुन्हे करतात. त्यामुळे अशा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवरही ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार पाटील यांनी केली.
मुख्य मुद्दे:
- ड्रग्ज कायद्यातील पळवाटांवर आमदार कैलास पाटलांनी ठेवले बोट.
- तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी मोकाट असल्याचा आरोप, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
- दारू, हातभट्टी आणि गुटखा तस्करांवरही ‘मकोका’ लावण्याची केली मागणी.