धाराशिव – राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट व धीम्या गतीने सुरू असलेल्या कामांमुळे वाढत चाललेल्या अपघाताच्या घटनांवर आमदार कैलास पाटील यांनी आज विधिमंडळात जोरदार आवाज उठवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही या मुद्द्याची गंभीर दखल घेत संबंधित गुत्तेदारांवर कारवाईचे आश्वासन दिले.
आमदार पाटील यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील येडशी – संभाजीनगर मार्गावरील अंडरपास व उड्डाणपुलांची कामे गुत्तेदारांनी घेतली असली, तरी ती वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. काम न झाल्यामुळे अपघात वाढले असून, धाराशिवजवळील एका शाळेसमोर मंजूर झालेल्या अंडरपासच्या ठिकाणी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली होती. मात्र, त्या बैठकीतील सूचनांची आजतागायत अंमलबजावणीच झाली नाही. खामकरवाडी येथे गाड्यांचा वेग इतका कमी होतो की चोरट्यांना गाडीत चढून चोरी करणे सहज शक्य होते, तर काही ठिकाणी गती प्रचंड असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
याशिवाय, सिंदफळ येथील उड्डाणपुलाचे, धाराशिव शहरातील भुयारी मार्गाचे तसेच येडशी येथील उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार? असा थेट सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या मुद्द्यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, आमदार पाटील यांनी नमूद केलेल्या तिन्ही प्रलंबित कामांची माहिती घेऊन संबंधित गुत्तेदारांनी जर कामे सुरू केली नसतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास त्यांना ब्लॅकलिस्टही करण्यात येईल.