धाराशिव: आठ दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण थांबवणे, हे काहींसाठी फक्त फोटोशूट आणि सोशल मीडियावर “रिल्स” पुरते मर्यादित असू शकते, मात्र प्रत्यक्ष काम करून दाखवण्याची जिद्द वेगळी असते, याचाच प्रत्यय धाराशिवमध्ये आला. वेतनासाठी ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. अखेर आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२४) उपोषणस्थळी भेट देऊन, अधिकाऱ्यांना पाचारण करत तब्बल तासभर थांबून हा प्रश्न मार्गी लावला. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सुवर्णा राजपूत यांनी आपले उपोषण मागे घेतले.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या संत गाडगेबाबा माध्यमिक (पोस्ट बेसिक) आश्रमशाळेत सुवर्णा दिलीपसिंग राजपूत या प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहेत. मात्र, संस्था प्रशासनाकडून त्यांना वेतन देण्यास टाळाटाळ केली जात होती. या अन्यायाविरोधात राजपूत यांनी सोलापूर येथील पिठासीन अधिकारी, शाळा न्यायाधीकरण यांच्याकडे धाव घेतली होती. न्यायालयाने १६ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या बाजूने अंतिम आदेश दिले होते.
इतकेच नव्हे, तर धाराशिव जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांनी १३ मे २०२५ रोजी आणि लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी राजपूत यांना वेतन देण्यात यावे, असे स्पष्ट पत्र दिले होते. मात्र, संस्थेच्यावतीने यावर कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्याने, हतबल झालेल्या राजपूत यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
आमदार पाटील तासभर थांबले, यंत्रणा हलवली


आमदार कैलास पाटील हे शुक्रवारी शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी सुवर्णा राजपूत या महिला कर्मचारी वेतनासाठी उपोषण करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. आ. पाटील यांनी तातडीने उपोषण स्थळी भेट देऊन राजपूत यांच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली.
त्यांनी केवळ भेट देऊन न थांबता, तब्बल तासभर त्याच ठिकाणी थांबून प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांना तातडीने उपोषण स्थळी बोलावून घेतले आणि राजपूत यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. आमदारांच्या या भूमिकेनंतर प्रशासनाने अवघ्या काही तासांत राजपूत यांना लेखी पत्र दिले. या लेखी आश्वासनानंतर सुवर्णा राजपूत यांनी आपले उपोषण स्थगित केले.





