धाराशिव: “शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे,” असे वक्तव्य करून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले नाही, तर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशा शब्दात शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी सडकून टीका केली आहे. आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आणि सत्तेचा अहंकार दाखवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आमदार पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “दरवर्षी अतिवृष्टी, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि तोट्याचे भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो. त्याला मदतीचा हात देण्याऐवजी त्याच्यावरच असे आरोप करणे म्हणजे सत्तेचा माज आहे. सत्तेच्या मखमली खुर्चीत बसल्यावर शेतकऱ्यांचे दुःख ऐकू येणे थांबते.”
त्यांनी सध्याच्या सरकारला निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून दिली. “सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निवडणुकीच्या काळात ‘कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना दिलासा देऊ’ असे घसा ओरडून सांगत होते, तेव्हा हा नाद गोड वाटत होता का? आता सत्तेत आल्यावर तीच मागणी ‘नाद’ कशी वाटते?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत आमदार पाटील यांनी उद्योगपतींच्या कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, “तुम्ही उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जमाफी करता, कर्जबुडव्यांना मोकळे फिरू देता, तेव्हा ‘नाद’ हा शब्द विसरता आणि शेतकऱ्याने मागणी केली की तुम्हाला त्रास होतो.”
“शेतकरी भीक नाही तर कर्जमाफीचा हक्क मागतोय. तो कधीही कोणासमोर झुकत नाही, पण वेळ आली की तो रानातून, रणांगणातून आणि मतदानातून नक्कीच उत्तर देतो,” असा इशाराही आमदार कैलास पाटील यांनी या पोस्टद्वारे सरकारला दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना टॅग केले आहे.