तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावरून “महायुतीतीलच काही विरोधक” बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप करणारे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आता आपल्याच वक्तव्यावरून घूमजाव केले आहे. धाराशिव लाइव्ह वृत्तवाहिनीने यावर भाष्य करताच, आमदार पाटील यांच्या कार्यालयाकडून एक सुधारित प्रेस नोट जारी करण्यात आले असून, यात ‘महायुती’ ऐवजी ‘महाविकास आघाडीतील’ काही विरोधक बदनामी करत असल्याचा उल्लेख आहे. या सारवासारवीमुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ ‘प्रिंट मिस्टेक’ होती की जाणूनबुजून केलेली चूक, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘प्रिंट मिस्टेक’ की राजकीय खेळी?
आमदार राणा पाटील यांनी सुरुवातीला थेट आपल्याच सत्ताधारी महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा रोख पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर असल्याची चर्चा होती. मात्र, आता शब्द बदलून आरोप महाविकास आघाडीवर ढकलण्यात आला आहे. पण, यावरूनही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाविकास आघाडीतील विरोधकांची तक्रार महायुती सरकारमधील सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्याचा तर्क काय? आणि मंत्री शेलार विरोधी पक्षातील नेत्यांवर काय कारवाई करू शकतात? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.
नेमका रोख कुणावर?
या संपूर्ण प्रकरणामुळे आमदार राणा पाटील यांचा नेमका रोख कुणावर आहे, याबाबतचा गोंधळ आणखी वाढला आहे.
- पालकमंत्री प्रताप सरनाईक?: सुरुवातीच्या पत्रकानुसार, त्यांचा रोख महायुतीतील अंतर्गत स्पर्धेतून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर होता का?
- माजी मंत्री जितेंद्र आव्हाड?: महाविकास आघाडीचा उल्लेख करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले आहे का?
- खासदार ओमराजे निंबाळकर?: की आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर स्थानिक राजकीय विरोधक असलेले शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या निशाण्यावर आहेत?
आमदार पाटील यांनी जरी आपल्या शब्दात सुधारणा केली असली, तरी या ‘चूक दुरुस्ती’ने वादावर पडदा पडण्याऐवजी नवा संभ्रम निर्माण झाला आहे. तुळजापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे राजकारण आता वैयक्तिक टीका-टिप्पणी आणि राजकीय कुरघोडीच्या वळणावर पोहोचले आहे.